२ नोव्हेंबरला भाजपचा मुंबईत एल्गार
मुंबई, दि. ३० : “नजीकच्या काळात सत्ता दिसणार नाही, या नैराश्यातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस व ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांपुढे फक्त अराजकतेचा मार्ग उरला आहे. त्यासाठी ते देशविरोधी प्रवृत्तींसोबत हातमिळवणी करत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी दि. २ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ’ असा एल्गार केला जाणार आहे,” अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी दिली.
‘लोकतंत्र बचाओ -अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ‘शिवतीर्थ’, शिवाजी पार्क येथून कामगार मैदानापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधानाप्रति आपली बांधिलकी व्यक्त करण्यात येणार आहे. ही पदयात्रा शांततापूर्ण पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि समाजात जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे,” अशी माहिती साटम यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिखडकर, बेता परुळकर, मुंबई भाजप प्रवक्ते अॅड. अनिकेत निकम यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.
“काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असून विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी विरोधकांकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सन्मान राखणे आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे,” असे साटम म्हणाले. “देशविरोधी प्रवृत्तींसोबत हातमिळवणी करून विरोधी पक्षांना त्यांच्या माध्यमातून सत्ता काबीज करायची आहे, असे सांगत त्यांनी ‘चंगूमंगू मिमिक्री आर्टिस्ट’ या शब्दात ठाकरे बंधूंवर टीका केली. तसेच “कांग्रेस ‘फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी’ असून, राहुल गांधी हे त्या फॅक्टरीचे प्रमुख आहेत,” अशी टीकाही अमीत साटम यांनी केली.
“लोकतंत्र बचाओ-अराजकता हटाओ’ अभियानाअंतर्गत मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जिल्हास्तरावर व विधानसभा स्तरावर प्रबुद्ध नागरिक संमेलने, तसेच विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करणे, लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता वाढवणे आणि नागरिकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणे, हा या कार्यक्रक्रमांचा उद्देश आहे. ‘विकसित भारत २०४७’ हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजात शांतता, एकता आणि लोकशाही मूल्ये टिकवून ठेवणे आवश्यक आहे. भाषा, जात, धर्म आणि प्रांताच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोध करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा मुंबई भाजपचा संकल्प आहे,” असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा मान आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा वाढली आहे. भारत जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला असून, देशात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ‘कोविड’ च्या जागतिक संकटाच्या काळात केंद्र सरकारने जाहीर केलेले आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि देशात राबविण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमामुळे भारताला संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली.”
नसीरूद्दीन शाह की ‘गुलफाम हसन’ ?
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या कथित वक्तव्याबाबत बोलताना आ. अमीत साटम म्हणाले की, “भारत तेरे तुकडे होंगे’, ‘इन्सा-अल्लाह, इन्शा अल्लाह’ आणि ‘अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा हैं,’ या घोषणा नेमक्या कोणत्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात? या घोषणांना नसीरुद्दीन शाह यांचे समर्थन आहे का, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी त्यांनी केली. जावेद अख्तर, शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकांवरही त्यांनी टीका केली.


















































































































































