LATEST NEWS

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढले वाभाडे

मुंबई, दि. 3 : जनाब संजय राऊत, 2019 ला तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला तेव्हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या चरणाखाली गाडला गेला. काल तुम्ही मोठ्या थाटात दिल्लीत राहुल गांधींच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलात तेव्हा त्यांनी स्टेजवर बोलूही दिले नाही. उद्धवजी ठाकरे सातत्याने राहुल गांधींचे कौतुक करतात; परंतु राहुल गांधी साधे उद्धव ठाकरेंचे नावही घेत नाहीत. तुम्ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले आणि काँग्रेसचे विचार आत्मसात केले. हा तुमचा स्वाभिमान आहे का, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत जाणे, सत्तेसाठी राहुल गांधींची गुलामी करणे, सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणे, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आपला राजकीय वारसा सोडणे, याला लाचारी म्हणतात. आणि ती लाचारी करण्याचे काम संजय राऊत, तुम्ही केले. मुळामध्ये तुमचा पक्षच नाहीये, तुमचा गटही नाही; तुमचा बचत गट उरलाय आणि या बचत गटाचा अध्यक्ष तुम्ही राहुल गांधींकडे नेऊन सोपवलाय. येत्या काळात संजय राऊत उद्धव गटाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करणार आहेत आणि त्यासाठीची सुपारीही त्यांनी घेतली आहे. ज्या बचत गटाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार आहे त्यांनी नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह, एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटावर टीका करू नये, असे श्री. बन यांनी सुनावले.

राहुल गांधी चीनच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्याचे काम करत आहेत आणि संजय राऊत त्यांना सहकार्य करताहेत. तुमचा देशातील संविधानावर विश्वास नाही. तुम्हा दोघांमध्ये हिंमत असेल तर काल अमितभाई शाह यांनी काल दिलेले आव्हान दिले स्वीकारा. अमितभाईंनी सांगितले की, तुम्हाला काही प्रश्न असतील, तर संसदेमध्ये चर्चा करायला या. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल आणि प्रत्येक शंकेचे निरसन केले जाईल. परंतु राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत चर्चा करायला तयार नाहीत. कारण अमितभाई शाहांसोबत तत्त्वांवर किंवा मुद्द्यांच्या आधारावर चर्चा करू शकणार नाही, हे त्यांना ठाऊक आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर त्यांना आपले अस्तित्व टिकवायचे आहे, अशी टीका श्री. बन यांनी केली.

श्री. बन पुढे म्हणाले, इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात जनसंघ मैदानात उतरला होता आणि देवेंद्रजींचे वडीलही मैदानात उतरले होते. आज तुम्ही कुठल्याही राज्यात जा, कुठेही आणीबाणी नाहीये. कुणालाही तुरुंगात टाकलेले नाही. तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकता, मोर्चे काढू शकता. तुम्हाला रेजिम चेंज करायचा असेल, तुमच्यात धमक असेल तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटाच्या बचत गटाने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सर्व जागांवर आपले उमेदवार द्यावेत आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत रेजिम चेंजसाठी प्रयत्न करावा. तुम्हाला संविधानाच्या मार्गाने रेजिम चेंज करण्याचा अधिकार आहे. परंतु रस्त्यावर उतरून बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती घडवून चेंज करायचा असेल, तर मात्र ते शक्य होणार नाही. कारण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा