पुणे, दि. 21 : तळेगाव ते चाकण दरम्यानच्या २६.३० किलोमीटर लांबीच्या चौपदरी उन्नत मार्गाचे काम वेगाने सुरू झाले असून, हे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

पुण्यातील औद्योगिक क्षेत्रांतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३.२० किमी लांबीच्या उन्नत महामार्गाचे भूमिपूजन १७ जुलै रोजी झाले. या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान चौपदरी उन्नत मार्ग आणि त्याखाली समांतर रस्ता बांधण्यात येणार आहे, ज्यासाठी अंदाजे ६,१५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, “तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा रस्ता पूर्ण झाल्यास ५० टक्के वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. शेवटच्या ८०० मीटरच्या भूसंपादनासाठी सहा महिने लागतील.” तसेच, नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या प्रस्तावित २८ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून, महिन्याभरात काम सुरू होईल. या मार्गामुळे शंभर टक्के वाहतूक कोंडी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘एआय’चा वापर

चाकण एमआयडीसी परिसरातील ५०० किलोमीटर रस्त्यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून करण्यात येईल.

३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविणार

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन कोंडी होत असल्याने, ३१ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विलंब केल्यास संबंधित अभियंते आणि कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावलीनुसार खड्डे न बुजवल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे .

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा